शब्दयोगी अव्यय मराठी | shabdyogi avyay marathi
आपल्या मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत या आठ जाती दोन विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत ,त्या दोन विभागलेल्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
वाचा 👉 मराठी ( स्वर , व्यंजने,स्वरादी ) वर्णमाला
शब्दयोगी अव्यय |
शब्द
विकारी (सव्यय) अविकारी ( अव्यय)
नाम क्रियाविशेषण अव्यय
सर्वनाम शब्दयोगी अव्यय
विशेषण उभयान्वयी अव्यय
क्रियापद केवलप्रयोगी अव्यय
1 ) विकारी शब्द (सव्यय ) | vikari shabd ( savyay)
ज्या शब्दांचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
2) अविकारी शब्द (अव्यय)
लिंग, वचन, विभक्तीमुळे कोणताही वाक्यात बदल होत नाही, त्यास अविकारी शब्द असे म्हणतात.
अव्यय समजून घेऊ
शब्दांच्या जातीमध्ये आतापर्यंत आपण शब्दांच्या जाती आठ आहेत हे पाहिले .त्यापैकी आपण सव्यय आणि अव्यय यांची विभागणी पाहिली. तसेच नाम,सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार जातींची (सव्ययांची) माहिती अभ्यासली वचन, लिंग, पुरुष ,विभक्ती ,काळ-अर्थ यांच्यामुळे चार जातीच्या शब्दांच्या रूपात बदल होत असतो हे आपण अभ्यासले.
शब्दांच्या जाती पैकी क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी ,केवलप्रयोगी या चार जाती अशा आहेत की त्यांना विभक्ती, लिंग, वचन यांचे प्रत्यय लागत नाहीत . त्यांच्या रूपात कोणताच बदल होत नाही. त्या जशाच्या तशाच राहत असतात. त्यांचा व्यय होत नाही . वाक्यातील कर्ता , कर्म, क्रियापद यांचे लिंग, वचन ,पुरुष जरी बदलले तरी त्यांची रूपे जशी आहेत तशीच राहतात; म्हणजेच त्यांचा व्यय होत नाही, म्हणून त्यांना अव्यय असे म्हणतात.
वाचा 👉 शब्दांच्या जाती सविस्तर
शब्दयोगी अव्यय
शब्दयोगी अव्यय वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी जो संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा.
-सर्व मुले नदीपर्यंत चालत गेली.
-मूर्खापुढे शहाणपण चालत नाही.
-गुरुजींनी प्रेमापोटी त्याला माफ केले.
पुढे, मागे ,आत ,बाहेर ,नंतर, जवळ, वर ,खाली यासारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे आहेत; परंतु नामाला जोडून आली
असतील तर ते शब्दयोगी अव्यय होतात.
शब्दयोगी अव्ययामुळे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दर्शवला जातो आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते. शब्दयोगी अव्यय नसल्यास वाक्य अर्थहीन होते ; तर क्रियाविशेषण अव्ययाने वाक्याच्या मूळ अर्थात भर टाकण्याचे काम केले जाते. क्रियाविशेषण अव्यय नसल्याने वाक्याच्या मूळ अर्थात कोणताच बदल होत नाही.
उदा .
१.पक्षी झाडावर बसला. (शब्दयोगी अव्यय) ,>> पक्षी झाड बसला.
२. पक्षी वर बसला. ( क्रियाविशेषण अव्यय ) >>पक्षी बसला.
यावरून
शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक
आपण पाहूया.
शब्दयोगी अव्यय
१. तो घरावर चढला
२.घरासमोर एक झाड आहे.
३. त्या दोघांमध्ये पडू नको.
४. माझ्याजवळ सायकल आहे
क्रियाविशेषण अव्यय
१. तो जिन्याने वर गेला .
२.अचानक वाघ समोर आला.
३. तू मध्ये का बोलतोस .
४. तो जवळ आला.
वाचा 👉मराठी भाषेचा उगम
शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे प्रकार
१) कालवाचक
अ) कालदर्शक:
उदा. पावेतो, नंतर ,आधी ,पुढे, पूर्वी इ.
1. आजपावेतो मी त्याला पाहिले नाही.
2. दुपारनंतर बक्षीस वितरण होईल.
3. जेवणाआधी गोळी घ्या.
4. दोन वर्षापूर्वी तो फलटणला स्थायिक झाला.
ब ) गतीवाचक
उदा. पासून, पर्यंत ,मधून ,खालून, आतून इ.
1. कालपासून माझी परीक्षा सुरू झाली.
2. मी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येईल.
3. दिवाळी वर्षातून एकदाच येते.
गती वाचक शब्दयोगी अव्यय यामध्ये कालदर्शक व स्थलदर्शक अशा दोन्ही शब्दांचा समावेश होत असतो.
2 ) स्थलवाचक:
बाहेर ,आत, अलीकडे ,पलीकडे ,मध्ये ,पुढे, समोर ,जवळ ,ठायी, पाशी ,समक्ष, समीप, नजीक इत्यादी.
1. वही कपाटात ठेवली आहे.
2. कॉलेजजवळच विद्यार्थी वस्तीग्रह आहे.
3. मंदिरासमोर एक शाळा आहे.
4. पाण्यामध्ये राहून माशांची वैर नको आहे.
5. मुलांची खेळणी घराबाहेर होती.
3) स्थलवाचक (साधन )
मुळे, करवी , योगे, हाती, द्वारा, कडून इ.
1. उन्हामुळे कपडे लवकर वाळतात.
2. कुत्र्याकडून मांजर मारली गेली.
3. त्याने दुसऱ्याहाती निमंत्रण दिले.
४ हेतूवाचक :
साठी ,करिता, कारणे , प्रीत्यर्थ स्तव, अर्थी ,निमित्त इ.
1. परीक्षेसाठी मला एक पेन हवा.
2. जीवन जगण्यासाठी अन्न खावे.
3. विद्यार्जनास्तव तो गुरुग्रही राहतो.
4. उपचारानिमित्त तो बारामती ला गेला.
5,) व्यतिरिकवाचक
शिवाय ,खेरीज, परता, वाचून, व्यतिरिक्त इ.
1. तुझ्याशिवाय सहलीला जाता येणार नाही.
2.मित्राविना शाळेत करमत नाही.
6) तुलनावाचक
पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस इ.
1.माणसापरीस जनावरे बरी.
2.मधुपेक्षा राम उंच आहे.
3.मुलांमध्ये श्याम जास्त खोडकर आहे.
7) योग्यतावाचक
समान, सम, जोगा, सारखा ,योग्य, प्रमाणे, बरहुकूम इ.
1. शिक्षक पदा योग्य एकाही व्यक्तीचा अर्ज आला नाही
2. हा आंबा खाण्यायोग्य नाही.
3. हा सदरा माझ्या मनाजोगा आहे.
8) कैवल्यवाचक
च ,ना, मात्र, पण ,फक्त ,केवळ इ.
मारुतीच समुद्र लंगून जाऊ शकतो.
टीप : फक्त केवळ मात्र ही शब्दयोगी अव्यय असून सुद्धा नामाला जोडून येत नाहीत
उदा.फक्त देव तुला या संकटातून वाचवू शकतो.
9) संग्रहवाचक
सुद्धा, देखील, ही ,पण ,बरीक इ.
1.मीसुद्धा तुला मदत करणार आहे.
2. देवदेखील भक्तासाठी धावून येत असतो.
10) संबंधवाचक
विशी,विषयी ,संबंधी इ.
-- शाळेविषयी माझ्या मनात खूप प्रेम आहे.
11) साहचर्यवाचक
संगे, सह ,बरोबर, सकट ,सहित, निशी, सवे, समवेत इ.
1. फुलासंगे मातीस सुवास लागे.
2. तो मुलाबाळांसह रानात गेला.
3. अंगच्या कपड्यानिशी तो निघून गेला.
4. सालीसकट फळे खाणे योग्य असते.
12) भागवाचक
पैकी, पोटी , आतून इ.
1. व्याजापोटी मला लाखो रुपये द्यावे लागले.
2. हजारातून एखादाच वाईट निघतो.
13) विनिमय वाचक
(एका वस्तूच्या बद्दल दुसरी वस्तू)
बद्दल ,ऐवजी, जागी, बदली इ.
1. गुळाऐवजी साखर द्या.
2. सचिनच्या जागी धोनीला खेळवणे योग्य ठर शकते.
14.) दिकवाचक (समोरची दिशा)
प्रत, प्रति, कडे, लागी
- - सर्वांप्रती आदर असावा.
-- तुझ्याकडे पुस्तक आहे का?
15,) विरोधवाचक
विरुद्ध ,वीण, उलटे, उलट
--भारताविरुद्ध कटकारस्थानी करण्यातच शेजारील देशांचे अर्धी शक्ती खर्च होत असते.
-- पोलिसांनी चोर पकडला, त्याउलट त्याने पोलिसांवरच मारहाणीचा आरोप केला.
16) परिमाणवाचक
भर
-दिवसभर पाऊस कोसळत होता.
-गावभर फिरून शेळ्या गोट्यात येऊन थांबल्या.
साधित शब्दयोगी अव्यय
1.नामसाधित : कड -कडे, अंत-अंती, पूर्व -
2. विशेषण साधित : योग्य ,विरुद्ध, समान, सहित, सारखा, सम
3. धातूसाधित: कर -करिता, देख- देखील , लाग -लागून
4. क्रियाविशेषणसाधित : मागून, पुढून ,खालून, वरून ,आतून
5. संस्कृत शब्दसाधित : परोक्ष, विना ,पर्यंत, समक्ष ,समीप
शुद्ध शब्दयोगी अव्यय
जे शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात; परंतु त्या नामाचे सामान्यरूप होत नाही, अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात .
उदा.ना ,ही, सुद्धा, देखील, मात्र, च इ .
*विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय*
विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाला विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणतात.
-माझ्याकडून तुला हे बक्षीस (तृतीया)
--लतापेक्षा नीता उंच आहे (पंचमी)
आणखी वाचा