मी निवृत्त शिक्षक बोलतोय| I talk retired teacher | mi nivrutt shikshak bolatoy
हो ! मी शिक्षक बोलतोय . शिक्षक म्हणून आज कार्यरत आहे पण खऱ्या अर्थाने शिक्षक बनणे किती अवघड आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे . शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना आपण काहीतरी बनायचे आपण शिकत शिकत पुढे जाऊ तसतसे आपले स्वप्न हे बदलत जाते .जसजसा आपण विचार करो तसतसा आपण स्वप्नांना बगल देऊन नवीन स्वप्नाकडे आकर्षित होतो .आज जे स्वप्न बघतो ते उद्या पूर्ण होत नाही म्हणून दुसरे स्वप्न पूर्ण करण्याकडे अट्टहास असतो .
मला मनापासून वाटतं होते की मी शिक्षकच होणार .यासाठी कोणत्या मार्गाने जावे त्याचा शोध घेतला. मी या पदासाठी लायक आहे की नाही हे अगोदर स्वतःसिद्ध केले . एखाद्या वेळेस आपलं वक्तृत्व चांगले असावे याचा आणि शिक्षक होण्याचा जास्त फार काही संबंध नाही असं मला वाटतं.
आपल्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारावर आपण मुलांना योग्य न्याय देऊ शकतो या विचाराने मी शिक्षक झालो.
शिक्षक म्हणून ज्यावेळेस रुजू झालो त्यावेळेस माझ्याकडे पुस्तके वाचन आणि शिक्षक होण्यासाठी जी कौशल्ये होती ;त्या कौशल्याच्या आधारावरच नवीन उत्साह निर्माण झाला विद्यार्थ्यांना नव्या जोमात नवनवीन प्रयोग, नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न करता येत होते ,मात्र जसजसे वर्ष निघत गेली, विद्यार्थी समजत गेले ,तसतसं माझ्या मते ह्या ज्ञानाचा उपयोग होत गेला. केवळ पुस्तकी ज्ञानच विद्यार्थ्यांना देणे रुचत नव्हते त्यासाठी इतर ज्ञानाचीही चर्चा करत होतो .
या पलीकडचे ज्ञान देणे हे मला आवडते तसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जे त्यांना हवं आहे ते देण्यासाठी धडपड असते .कोणीतरी अधिकारी बनावेत ,जीवन जगताना उत्तम नागरिक बनविणे यासाठी मी त्यांना माझ्या अध्यापनातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे .
मुलांनी शिस्त पाळावी यासाठी माझा अट्टहास असायचा.जीवन जगताना नागरिक होण्यासाठी जे काही करता येईल ते ते करून घेण्यासाठी संस्कार देण्यासाठी माझा अभ्यास उपयोगी पडत आहे. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान देताना विद्यार्थ्यांसोबतच आत्मसंवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी ह्या जाणून सोडविण्यासाठी प्रयत्न असतो .
' विद्यार्थीकेंद्री ' शिक्षण हे खूप चांगले शिक्षण आहे विद्यार्थी हाच आपला देव आहे आणि देवाची पूजा करणे हे आपले परमकर्तव्य आहे याचा विसर होत नाही . सगळे कसे व्यवस्थित चाललेले असताना माझ्या निवृत्तीचा काळ आला ,खूप दुःख वाटत होते ,मला अजून विद्यार्थ्यांना अजून नवनवीन काहीतरी सांगायची उत्सुकता आता मावळणार याचा खेद वाटला .
निवृत्त होताना अनेकांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या . "तुमच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा ! ". अशा शुभेच्छा देऊन सगळे कसे पोटावर हात फिरवून तृप्त झाले ,पण माझी खरी व्यथा सुरु झाली .
मी काही काळ गाजवलेला शिक्षक असलो तरी मला नंतर मात्र कोणीही बोलण्याची धडपड करत नव्हते ,मी दिसलो की कोणाच्या कपाळावर आट्या येत होत्या तर कोणी वरवरचे स्मितहास्य करुन पुढे जात होते .शाळेत असताना मुलांचे पालक तासंनतास गप्पा मारायला थांबत होते आता मात्र बोलायला तयार नाहीत .
मी मात्र विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडविले यातच खूप समाधान वाटत होते काहींचे फोटो पाहून मनातून रडत बसत आहे .माझे कितीतरी विद्यार्थी मोठमोठया पदावर पोहचले काहींना माझी आठवण येते तर काहींनी ती आठवण सुद्धा विसरले .शिक्षक दिनादिवशी मुलांचा फोन आला तर सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात आणि फोन ठेवताच मला भावना आवरता येत नाही .
मी या राहुलला किती ओरडलो ,मार दिला ,कित्येक दिवस बोललो नव्हतो त्याच्याशी पण त्याने आपली जिद्द ठेवून मला न विसरता प्रत्येक शिक्षक दिनाला शुभेच्छा पत्र पाठवत राहिला आता कुठे मोबाईल आले आहेत म्हणून बोलायला मिळते .
आजूबाजूला असणारी मुले शाळेत जाताना- येताना दिसल्यावर खूप गलबलून येते, प्रत्येक वर्षी येऊन गेलेल्या मुलांचे चेहरे जसेच्या तसे आठवतात . काहीच आठवले तरी त्यातून वर्गातील सगळा गलका डोळ्यासमोर उभा राहतो .मुलांना भेटावे वाटते तर काहींना भेटून स्पर्धेत बक्षीस मिळावे म्हणून केलेली कसरत ट्रॉफी बघून गहिवरुन येते . कोणा विद्यार्थ्यांना भेटावे म्हणले तरी कोणीच सापडत नाहीत .तुमच्या जवळ यावे तर एवढ्या लांबचा पट्टा कधी येणार, मी पश्चिम महाराष्ट्रात तर तुम्ही सगळे उत्तर महाराष्ट्रातील तुमचा खानदेश ,अहिराणी बोली माझ्या मनातून निघत नाही .
शाळेत असताना तुमच्यात कसा दिवस जात होता तेच कळत नव्हते ,तुमच्यात रममाण होऊन गेल्यावर घरातील बायको पोरे याचा विसरच होऊन जायचा, त्यामुळे घरी गेल्यावर घरातील आवाजाची सवय होऊन गेली होती . तुमच्या स्पर्धा, परीक्षा ,ज्यादा तास घेण्यात गुंग असल्याने मला घरातील आवाजाचा काहीच राग येत नव्हता .कधी कधी तर मलाच चहा करुन प्यायला लागला .तरी मनात समाधान वाटत होते .
आज मात्र तुमच्यात गुंग होता येत नाही ना घरातील आवाज ऐकू येईना ,दोन वर्षे घरातील आवाज सुद्धा बंद होऊन गेला .सुनांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करुन तुमच्या आठवणीतील पुंजी फोटो, ट्रॉफ्या,पत्र ,ग्रीटिंग कार्ड ,आजही जपून ठेवल्या आहेत. त्याच जगण्याला आधार देत आहेत .पुढच्या शिक्षक दिनाला जगलो तर मीच खानदेशात येणार आहे.सगळ्या बॅचमधील मुलांना बोलावणार आहे .सुखी रहा !
#आणखी माहिती वाचा